Monday, August 6, 2012

पाऊस....!

आज तुला पाहत रहावसं वाटतंय...बरसताना, गरजताना...

किती झेलले पावसाळे आम्ही, असं म्हणणा-यांच्या त्या शब्दांची गम्मत वाटते. खरंच तुला कोणी झेलू शकतो का? ओघळून जातोस हातातून नकळत...तू कोणाच्या तावडीत न सापडणारा...मुक्त, स्वच्छंद..!

दाटून आलास की हलकेच रिमझिमणारा आणि वादळाशी हात मिळवलास की बेछूट कोसळणारा.. असा तू मला नेहमीच हवाहवासा...निर्बंध, निराकार आणि तितकाच निर्मळही! नाला होऊन वाहीलास किंवा मातीने माखलास तरी न मळणारा तू !
प्रत्येक सर तितकीच आतुर प्रत्येक वेळी मातीत मिसळण्यासाठी. मातीत मिसळूनही स्वतःचं अस्तित्व जपणारी...
किती गूढ आहे तुझ येणं... बरसणं...मिसळणं...वाहणं...आणि परतणंही...! ज्याला हे गूढ उमगलं, त्याने मिळवलं. बाकी पामरांसाठी तू फक्त पाणी आणि भिजलेली माती म्हणजे चिखल...बस्स...!

Friday, July 27, 2012


पुन्हा पुन्हा हरवते तुझ्यात मी
नव्याने गवसते तुझ्यात मलाच मी...
जवळ असता तुझ्या वाटते
तुझ्यात विरघळून जावे मी;
तू दूर असता मात्र वाटते
क्षणभरात वितळून जावे मी.....

तो वटवृक्ष कोसळलेला...

एक झाड ते वडाचे पारंब्यांनी वेढलेले
सावलीत होते मी त्या शांत पहुडलेले

एक तिरीप ना उन्हाची, ना झळ वादळाची
होते किती निवांत, होती भ्रांत ना कशाची

होती फांद्यांवरी त्या कित्येक खगांची घरटी
ना पडे कधीही त्यावर नियतीची काकदृष्टी

त्या वृक्षामुळेच होती त्या माळराना शोभा
समृद्ध होता मुळांनी त्या धरतीचाही गाभा

परि एका क्षणी मुळाशी घाव असा झाला
नियतीने माळरानी होता कावा साधलेला

पहिला तेव्हा मी तो वटवृक्ष कोसळलेला
अन पारंब्या विखुरलेल्या......

पारिजात

काही सुगंध आठवणींच्या गंधाचा दरवळ पसरवून जातात. चालता चालता पारिजातकाच्या फुलांचा सडा पाहून आज पुन्हा ते दिवस आठवले, जेव्हा असाच सडा अंगणभर पडून बारीक नारंगी नक्षी अंगावर लेवून शुभ्र चटई अंथरल्याचा भास व्हायचा. तो सुवास हवेच्या प्रत्येक झोतासोबत झुलत, दरवळत राहायचा. पावसाने भिजवलेली झाडे आणि पानांवरून ओघळणारे पारदर्शी थेंब... गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक सावरत त्या फुलांना वेचून ओंजळीत घेऊन श्वास भरून तो सुवास उरात साठवण्याचा प्रयत्न करणारी ती चिमुरडी मी... आज पुन्हा आठवले मी मलाच...!