Wednesday, September 16, 2020

चितळे मास्तरांच्या निमित्ताने..

 


आज पुलंचं चितळे मास्तर पाहिलं. खूप काहीतरी काळाच्या मागे सुटल्याची हुरहूर लागली मनाला. साधारण 25 वर्षांपूर्वी पर्यंत अस्तित्वात असणारी शिक्षण पद्धती. मी नशीबवान म्हणून निसटता का होईना पण त्या पद्धतीचा स्पर्श मी अनुभवलाय. त्या शाळा, ती बाकडी, ते फळे, जुन्या खोल्यांसारखे पण स्वच्छ असलेले वर्ग आणि या सगळ्यांची ओढ लावणारे शिक्षक. शिकवणे हा केवळ अर्थार्जनाचा मार्ग नसायचा त्यांच्यासाठी..तो ध्यास असायचा, लोकसेवा असायची ! शिकवण्याची ती तळमळ आत्ताच्या चाकरमान्यांमध्ये दिसणे दुर्मिळ. हातावर छडी बसायची, पाठीत धपाटाही मिळायचा, पण ते abusing वाटलं नाही कधी.

तेव्हा वेगळी शिकवणी वगैरे प्रकार अगदीच कमी, ते पण 'ढ' मुलांना शिकण्याचा वेग मिळावा यासाठी सुरू झालेले. मी कधीही या 'शिकवणी' प्रकारात मोडले नाही. सहावी मध्ये असताना एका अपंग शिकवणी घेणाऱ्या व्यक्तीला मदत व्हावी म्हणून काय तो शिकवणीचा घाट घातला होता आमच्या बाबांनी, पण ती शिकवणी आमची कमी आणि त्या शिक्षकाचीच जास्त असायची. असो.

आता सगळेच वासे उलटे फिरलेले दिसतात. कसे ते काही वेगळे सांगायची गरज नाही.

एक मात्र खरं की आत्ताच्या पिढीला मोठं झाल्यावर आपल्या शिक्षकांना आठवून डोळ्यात पाणी येणे, हात जोडले जाणे वगैरे प्रकार क्वचितच घडतील. शिक्षणपद्धतीचे एक पर्व काळाच्या पडद्याआड गेल्याची खंत ती कायम राहील!


2 comments: