Wednesday, January 13, 2010

इये मराठीचिये नगरी...

इये मराठीचिये नगरी, रामराम मंडळी...!

मराठी माणसाची अस्मिता जागी ठेवण्यासाठी तसे अनेक कार्यकर्ते कार्यरत आहेत, परंतु मला वाटते की अस्सल मराठी माणसाचा मराठी बाणा ही कधीही न झोपणारी गोष्ट आहे जिला जागे करण्याची मुळी गरजच नाही. हां आता, कधी कधी ती जरा सुप्तावस्थेत जाते, पण वेळेवर ती नक्कीच मराठी असण्याची लाज राखते आणि स्वाभिमानाने पेटूनही  उठते हेही नसे थोडके...!

थोडक्यात काय तर अशी ही मराठी अस्मिता बऱ्याचदा माझ्यासारख्या पामराच्या हृदयात असे काही तरंग उठवते की शब्दांच्या तालावर कधी भावना कागदावर उतरतात आणि कविता ज्याला म्हणता येइल अशी एखादी शब्दरचना तयार होते ते आकलनाच्या थोड़े पलीकडे जाते. त्यातलीच एक रचना इथल्या या पानावर:

" कुणीतरी अस्पष्टशी साद जणू घालतंय,
अलवार एक पाऊल मनामध्ये वाजतंय,
चाहुल कसली कळणारही नाही कदाचित,
पण कुठल्याश्या वळणावर जणू वाट कुणी पाहतंय...
सरेल रात्र,  उजाडेल सकाळ,
दुपारच्या उन्हात मात्र  सावली कुणीतरी देतंय..!

गोष्ट तीच जुनी नव्याने कुणीतरी सांगतंय,
चित्र तेच जुने, नव्या रंगात कुणी रंगवतंय..
चाहुल कसली कळणारही नाही कदाचित,
पण स्वप्नाशी वास्तवाची गाठ कुणीतरी बांधतंय..!"



(कृपया या रचनेत शास्त्रशुद्धता शोधू नये, रचनेच्या नियमांपेक्षा भावनांना प्राधान्य द्यावे ही नम्र विनंती..! नियमभंग झाला असल्यास क्षमस्व!)




1 comment:

  1. Baap re...kiti chhan lihilay g???i think Didi la lihile asave..not sure...

    ReplyDelete