Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Friday, September 11, 2020

मला वाटतंय..


मला वाटतंय चंद्राला आज पकडून खाली आणावं 
दोन्ही हातांच्या मिठीत त्याला घट्ट कुरवाळून धरावं 
म्हणावं राहा थोडा वेळ माझ्याजवळ माझाच होऊन
पण तितक्यात कश्याला आकाशाने रागाने असं बघावं.. 
🌙☺

Wednesday, September 9, 2020

पाहिजेच पाहिजे..


पाहिजेच पाहिजे.. 
वाफाळता चहा, भिजलेली सकाळ आणि तू 
गरम कांदाभजी, पावसाची सर आणि तू 
उबदार पांघरूण, गुलाबी थंडी आणि तू 
ओलेतं रान, वारा बेभान आणि तू 
पाहिजेच पाहिजे..!!

Friday, August 28, 2020


सावळ्याचा रंग आभाळभर पसरला
बासरीतला सुर जणू सर होऊन बरसला

मन रंगले रंगले मेघासोबत सावळे
अंगभर पांघरले ओले सरींचे सोवळे

मी घेतला घेतला धरतीचा हिरवा वसा
रुजल्या ओलाव्याला आता कशाला आडोसा

- अनुराधा

Wednesday, August 26, 2020


आज पुन्हा सुरुवात करावी म्हणतेय
 पुन्हा एकदा लिहायला शिकतेय
 अडगळीतून शोधून स्वतःलाच पुन्हा
 धूळ झटकून जरा वापरायला काढतेय... 


 - 25 ऑगस्ट 2020, 11.56 pm

Friday, January 22, 2010

ते शब्द आणि ती अधूरी कविता ..

या ओळी त्या काही शब्दांसाठी ज्यांची कविता कधी बनलीच नाही....

"ते शब्द जरी भुतकाळात हरवले, 
तरी त्या शब्दांनी आठवणीतले क्षण मात्र फुलवले...
भावनांना शब्दांचे आवरण जरी  नाही मिळाले, 
तरी त्या भावनांनीच ते सुरेख स्नेहबंध जुळवले..
त्या अधु-या कवितेने खूप काही दिले...
तुझी सोबत दिली, 
तुझ्यासोबत घालवलेली ती कातरवेळ दिली,
ते निखळ हसू दिलं,
ती मैत्रीची आश्वासक साथ दिली... 

ते शब्द असेच राहूदेत,
त्यांचे हे अधुरेपणच संकेत आहे;
आपण पुन्हा-पुन्हा भेटण्याचा,
हातात हात धरून चालण्याचा,
डोळे ओले होईपर्यंत हसण्याचा,
आणि भेटल्यावर बांध फुटून वाहणा-या  आसवांचाही ...!"