Friday, July 27, 2012


पुन्हा पुन्हा हरवते तुझ्यात मी
नव्याने गवसते तुझ्यात मलाच मी...
जवळ असता तुझ्या वाटते
तुझ्यात विरघळून जावे मी;
तू दूर असता मात्र वाटते
क्षणभरात वितळून जावे मी.....

तो वटवृक्ष कोसळलेला...

एक झाड ते वडाचे पारंब्यांनी वेढलेले
सावलीत होते मी त्या शांत पहुडलेले

एक तिरीप ना उन्हाची, ना झळ वादळाची
होते किती निवांत, होती भ्रांत ना कशाची

होती फांद्यांवरी त्या कित्येक खगांची घरटी
ना पडे कधीही त्यावर नियतीची काकदृष्टी

त्या वृक्षामुळेच होती त्या माळराना शोभा
समृद्ध होता मुळांनी त्या धरतीचाही गाभा

परि एका क्षणी मुळाशी घाव असा झाला
नियतीने माळरानी होता कावा साधलेला

पहिला तेव्हा मी तो वटवृक्ष कोसळलेला
अन पारंब्या विखुरलेल्या......

पारिजात

काही सुगंध आठवणींच्या गंधाचा दरवळ पसरवून जातात. चालता चालता पारिजातकाच्या फुलांचा सडा पाहून आज पुन्हा ते दिवस आठवले, जेव्हा असाच सडा अंगणभर पडून बारीक नारंगी नक्षी अंगावर लेवून शुभ्र चटई अंथरल्याचा भास व्हायचा. तो सुवास हवेच्या प्रत्येक झोतासोबत झुलत, दरवळत राहायचा. पावसाने भिजवलेली झाडे आणि पानांवरून ओघळणारे पारदर्शी थेंब... गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक सावरत त्या फुलांना वेचून ओंजळीत घेऊन श्वास भरून तो सुवास उरात साठवण्याचा प्रयत्न करणारी ती चिमुरडी मी... आज पुन्हा आठवले मी मलाच...!

Sunday, September 11, 2011

" प्रश्नं "

काही नात्यांची गुंतागुंत, खूप सारे प्रश्नं, सापडली म्हणताच पुन्हा हरवलेली त्यांची उत्तरं...परक्यांमधलं आपलेपण आणि आपल्यांमधलं परकेपण ! का आणतं एखाद्याला आयुष्य अश्या वळणावर? ज्यांना आयुष्यभर आपलं म्हणण्याची अतोनात इच्छा असते, तेच का आपल्याला परकं करून टाकतात? एकदाही विचार करत नाहीत नव्या नात्याचा, नात्यातल्या नाविन्याचा ? अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण अपेक्षांच्या ओझ्याखाली एखाद्याला दाबून टाकून त्याच्या अपेक्षांची माती करणं कितपत योग्य आहे ? घट्ट कवटाळून घेण्यासाठी हात पुढे केल्यावर नेमका आपला हात झुगारून दिला जातो. मायेने जवळ घ्यावं असं वाटताच तुम्हाला कोणी उडवून लावावं. असं खरंच का होतं? नक्की चुकतं काय आणि कुठे? खरंच का आपली सगळी ओळखच संपवून टाकावी लागते आयुष्यातल्या काही नव्या नात्यांना वाव देण्यासाठी ? त्याशिवाय ते नाहीच का कधी आपले होऊ शकत? पण मग असं करताना स्वतःच्याच नजरेला नजर मिळवतांना आपलं अस्तित्वच संपल्याची जी भयानक जाणीव होते तिचं काय? ती वाटून घ्यायला तर कोणीच येत नाही न सोबत? तुम्ही स्वतःलाही पण तर गमावलेलं असतं तोवर....!!!

Tuesday, March 9, 2010

आठवणीच्या गावात...


आठवणीचे गाव... या गावी जाणारे रस्ते तर सगळेच ओळखीचे; प्रत्येक पायवाट आपली, आपल्याच पाऊलखुणानी बनलेली...

मन आपलं वेडं वासरू. नकळत पुन्हा पुन्हा धाव घेतं तिकडे, पाऊलखुणा चाचपडत.. काही ठळक तर काही धूसर आणि काही काळाच्या ओघात मिटून गेलेल्या अश्या सर्वच ठश्यांच्या त्या पायवाटा तेवढ्या साक्षीदार..! अजूनही मुळ घट्ट रोवून उभी असणारी काही झाडं आणि काळासोबत उडून गेलेल्या पाखरांच्या अस्तित्वाच्या खुणा जपणारी त्यांच्या फांद्यांवरची असंख्य घरटी. ती सगळीच पाखरं आपल्या ओळखीची, कारण हे आठवणीचं गावच मुळी आपलं...त्यातली बरीचशी फक्त आठवणीचाच भाग बनून उरलेली तर काही अजूनही आपल्या वर्तमानात रंग भरू लागणारी.

डोळयांसमोरून तरळणारे अनेक ऋतू...ऊन्हाच्या झळयांनी अंगाची लाही लाही करणारे, पावसाच्या बेधुंद सरींनी न्हाऊन निघालेले, गुलाबी थंडीने  शहारलेले...

कितीतरी आठवणी...
अनवाणी पायांनी अंगणात  हुंदडणा-या बालपणीच्या, उत्सुकतेपोटी आईला विचारलेल्या निरागस प्रश्नांच्या, त्यांना तितक्याच सहजतेने तिने दिलेल्या उत्तरांच्या, बाबांनी सुनावलेल्या कड़क शब्दांच्या, पुन्हा त्यांच्याच कुशीत शिरून फुटलेल्या हुंदक्यांच्या, शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकलेल्या पहिल्या दिवसाच्या, होस्टेलवर परक्यांमध्येही सापडलेल्या आपल्या माणसांच्या, समजून घेणा-या जिवलग मित्र- मैत्रिणींच्या, कट्ट्यावर बसून तासंतास मारलेल्या गप्पांच्या, टपरीवरच्या चहा-समोस्यांच्या, परिक्षेच्या दिवसांत जागून काढलेल्या रात्रींच्या,  त्या चार भिंतीत रंगणा-या खुल्या व्यासपिठाच्या, दूर जाताना ओघळणा-या अश्रुंच्या, कमवायला लागल्यावर ऑफिस मधल्या काही आपल्यांच्या तर काही परक्यांच्या...

अश्या असंख्य आठवणीच्या त्या पायवाटा. त्यांच्यावारूनच त्या गावात फिरायचा आणि मनसोक्त हुंदडण्याचा या मनाचा आवडता छंद! या पाऊलवाटा जश्या गावात नेतात तश्याच कळत- नकळत बाहेरही आणतात, वर्तमानाचं भान करुन देतात आणि त्याच मनाला एक बळ देतात वर्तामानातून भविष्यात एकेक पाऊल टाकण्याचं..आठवणीच्या गावात एका नव्या पाऊलवाटेची सुरुवात करण्यासाठी..!















Monday, January 25, 2010

"अंकुर"


"अंकुर"

तात्पुरती ओल मिळालेल्या मातीत एक अंकुर फुटू पाहतोय,
डोकं वर काढून आकाशाला भीड़ण्याची स्वप्नं पाहतोय,
दोन पात्यांचे चिमुकले हात त्या आकाशाच्या दिशेने उभारतोय,

हेच हात आपले हजारोंच्या संख्येने वाढतील, 
पाना-फुला-फळानी सर्व दिशांनी बहरतील,
हवेच्या तालावर अनेक बहर झुलवतील,
पाखरांच्या घरट्याचे आश्रयदाते होतील, 
थकलेल्या वाटसरूवर सावलीचं पांघरुण घालतील,
चिमुकल्या फुलांनी जमिनीवर शिंपण टाकतील...

पण स्वप्न पाहता पाहताच झळ कसलीशी लागतेय,
तीच माती ओल संपून रुक्ष होऊ पाहतेय,
तेच आकाश उन्हाचे जळजळीत बाण चालवतेय,
तीच हवा उष्ण होऊन अंगअंग जाळतेय...

तळमळतोय अंकुर तो तीळतीळ जळताना,
पाहतोय उंचावलेले हात आपले पुन्हा मातीकडे झुकताना,
जीव जाता जाता मात्र आकाशाकडे पुन्हा एकदा पाहताना ,
अखेरच्या श्वासातही पुन्हा निक्षून सांगताना,
'पुन्हा ओल मिळेल
पुन्हा मातीत जन्म घेईल,
पुन्हा हवा झुलवेल,
पुन्हा अंकुर फुटेल...!'

   


Friday, January 22, 2010

ते शब्द आणि ती अधूरी कविता ..

या ओळी त्या काही शब्दांसाठी ज्यांची कविता कधी बनलीच नाही....

"ते शब्द जरी भुतकाळात हरवले, 
तरी त्या शब्दांनी आठवणीतले क्षण मात्र फुलवले...
भावनांना शब्दांचे आवरण जरी  नाही मिळाले, 
तरी त्या भावनांनीच ते सुरेख स्नेहबंध जुळवले..
त्या अधु-या कवितेने खूप काही दिले...
तुझी सोबत दिली, 
तुझ्यासोबत घालवलेली ती कातरवेळ दिली,
ते निखळ हसू दिलं,
ती मैत्रीची आश्वासक साथ दिली... 

ते शब्द असेच राहूदेत,
त्यांचे हे अधुरेपणच संकेत आहे;
आपण पुन्हा-पुन्हा भेटण्याचा,
हातात हात धरून चालण्याचा,
डोळे ओले होईपर्यंत हसण्याचा,
आणि भेटल्यावर बांध फुटून वाहणा-या  आसवांचाही ...!"